केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्यमंत्र्यांचा आघाडीला घरचा आहेर

 

मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर त्यांनी पंजाब हे दुसरे राज्य जिंकले. असा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथे व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकरांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला.

यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जिल्हा परिषदेतही परिवर्तन झाले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले. सर्वसामान्यांच्या आरोग्याला महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य झाले. मोफत रेमडेसिविर वाटणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षण विषयात केजरीवाल सरकारने दिल्लीत चांगले काम केले आहे. आता तसेच काम महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू कराव्यात. तसेच अनेक शिक्षक चांगले काम करतात. परंतू अजूनही अनेकांचे शिक्षणाव्यतिरिक्त इतरत्रच जास्त लक्ष असते. ते त्यांनी अध्यापनाकडे दिल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना आणखी चांगले शिक्षण मिळू शकेल.

Team Global News Marathi: