“शरद पवार पावसात भिजले अन् न्युमोनिया भाजपला झाला”; राष्ट्रवादीचा पडळकरांना टोला

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीआधी साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले ही गोष्ट साऱ्यांनाच माहिती आहे.या मुद्द्यावरून शुक्रवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. “साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही आणि ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार ‘तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका’ असं सांगावं लागत आहे”, असं पडळकर म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीकडून त्यांना सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “शरद पवार पावसात भिजले पण न्युमोनिया मात्र भाजपला झाला”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला.

“गोपीचंद पडळकर उठसूठ शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य करत असतात. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही, हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो. साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवार यांनी जनतेला आवाहन केले होते आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. म्हणून ते सतत त्यांच्यावर टीका करत असतात”, अशा शब्दात तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला.

“शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे त्यांनाही कळून चुकलं आहे. ते अक्षरश: रोज पवारांवर आणि राष्ट्रवादीवर टीका करतच असतात. वारंवार शरद पवार यांचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळविण्याची त्यांची धडपड सुरू आहे”, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे. यावर आता गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: