मराठीत शिक्षण झाले म्हणून मुंबई पब्लिक स्कूलने नोकरी नाकारली

आज संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे मराठी भाषेची गाळपेची होताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मराठी शाळेच्या माध्यमात शिक्षण झालं म्हणून मुंबई महापालिकेत नोकरी नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.

या झालेल्या अन्याय विरोधात १५० मराठी तरुण आणि तरुणी गेले २५ दिवस आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज महाराष्ट्रातच मराठी शाळेत शिकलेल्या तरुण, तरुणींना न्याय मिळत नसेल तर मराठी भाषा दिनाचे नुसते गोडवे गाऊन काय उपयोग? असा सवाल मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मय सुमित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या एका पत्रात केला आहे. तसेच या तरुणांना तात्काळ न्याय मिळावा अशीही मागणी केली आहे.

प्रकरण असे की, मुंबई पब्लिक स्कूल या मुंबई महापालिकेच्या शाळाप्रकारात नोकरीसाठी उमेदवाराचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक आहे, असा २००८ साली ठराव करण्यात आलेला होता. त्या ठरावाचा आधार घेऊन या १५० तरुणांना नोकरी नाकारली आहे. हे केवळ तोंडीच सांगितले असून तसे लेखी काही दिले नाही. त्याविरोधात सर्व तरुण-तरुणींनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Team Global News Marathi: