भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीच्या अडचणी वाढल्या ACB कडून चौकशी सुरु

भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परेल इथल्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. दिनांक 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते.

या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच दिनांक 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च ईत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा आढळून आली.

किशोर वाघ यांच्याकडे असणारी ही अपसंपदा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 90 टक्के इतकी आहे. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) व 13(1)E या कलमांतर्गत दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सध्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असणाऱ्या चित्रा वाघ यांची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान अशी काहीशी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांच्या पतीची ही खुली चौकशी त्या आत्ता ज्या पक्षात आहेत त्या भाजपची राज्यात सत्ता असतानाच सुरु करण्यात आली होती. याच प्रकरणामुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची तेव्हा चर्चाही रंगलीही होती.

Team Global News Marathi: