जाणून घ्या सुरू ऊस लागवडीचे नियोजन

जाणून घ्या सुरू ऊस लागवडीचे नियोजन

सुरू ऊस लागवड ही डिसेंबर मध्यापासून १५ फेब्रुवारीपर्यंत करता येते. या काळात लागवडीसह खत व पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ मिळते.
– डॉ. यू. एन. आळसे, प्रा. डी. डी. पटाईत

जमीन व हवामान –
– मध्यम काळी, मध्यम मगदुराची व उत्तम निचऱ्याची खोल (६० ते १२० सें.मी.) जमीन निवडावी.
– उष्ण हवामान, भरपूर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश व जास्तीची आर्द्रता असल्यास उत्पन्न व साखरेचे प्रमाण वाढते. पीकवाढीच्या काळात साधारणतः २४ ते ३० सें.ग्रे. तापमान असावे.

मशागत –
ऊस पीक २-३ वर्षे शेतात राहत असल्यामुळे पल्टीनांगराने नांगरणी करून उभी आडवी मशागत करावी. शेवटच्या पाळीच्या वेळी २५ टन/ हे. शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.

वाण –
कोएम- ८८१२१ (कृष्णा), को- ८०१४ (महालक्ष्मी), को- ८६०३२ (नीरा), को- ९४०१२ (फुले सावित्री), कोव्हीएसआय- ९८०५, को- ९५०१२, एम-एस- १०००१, कोसी- ६७१.

लागवड –
अधिक उत्पादन मिळण्यासाठी रुंद सरी पद्धतीने (पट्टा पद्धत) लागवड करावी. यामुळे पाणी व बेणे मात्रेत बचतीबरोबच आंतरमशागत सोयीची होते. पट्ट्यामध्ये पाचट आच्छादन केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. पाचट कुजल्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.

जमिनीच्या प्रकारानुसार दोन सरींतील अंतर –
१) मध्यम जमीन (१ ते ५ फूट खोल किंवा ३० ते १५० सें.मी.) – ४ फूट (१२० सें.मी.) अंतरावर सरी घ्यावी.
२) भारी जमीन (५ फुटापेक्षा खोल किंवा १५० सें.मी. पेक्षा खोल) – ४ ते ५ फूट किंवा १२० ते १५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात किंवा २.५ x ५ फूट (७५ x १५० सें.मी.) किंवा ३ x ६ फूट (९० x १८० सें.मी.) जोड ओळ पद्धतीने सऱ्या पाडाव्यात. ठिबक सिंचनासाठी जोड ओळ पद्धतीने लागवड करावी.

लागवड पद्धत –
– एक डोळा, दोन डोळा व तीन डोळा पद्धतीने ऊस लागवड केली जाते; परंतु एक डोळा पद्धतीमध्ये टिपरी तयार करताना जास्त काळजी घ्यावी लागते आणि तीन डोळे पद्धतीत बेणे जास्त लागते, त्यामुळे दोन डोळे टिपरी पद्धत फायदेशीर ठरते. एक डोळा पद्धत टिपरी तयार करताना डोळ्यांचा वरचा भाग १/ ३ व खालचा भाग २/ ३ ठेवावा.
– एक डोळा पद्धतीमध्ये (को-८६०३२) दोन रोपांतील अंतर दीड ते दोन फूट ठेवावे व इतर लवकर येणाऱ्या वाणांसाठी एक ते दीड फूट ठेवावे. दोन डोळे पद्धतीमध्ये दोन टिपऱ्यांतील अंतर ९ इंच ठेवावे.

बेणे प्रक्रिया (रासायनिक) –
– लागवडीपूर्वी बेणे मॅलॅथिऑन ३०० मि.ली. अधिक कार्बेंडाझीम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावे. उगवण चांगली होण्यासाठी ५ किलो चुन्याची निवळी १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे प्रक्रिया करावी.
– चाबुक काणी व गवताळ वाढ रोगाच्या नियंत्रणासाठी, उष्ण हवा प्रक्रिया ५४ अंश तापमानात १५० मिनिटे करावी.
– खोडकिडा – मॅलॅथिऑन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे बेणे प्रक्रिया करावी. महिन्यानंतर फिप्रोनिल (०.३% दाणेदार) २५ किलो प्रतिहेक्टर जमिनीतून द्यावे.

जैविक –
रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर १०० लिटर पाण्यात अॅझेटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, अॅझोस्पिरीलम व स्फुरद विद्राव्य जीवाणू प्रत्येकी सव्वा किलो याप्रमाणे एकूण पाच किलो मिसळावे. त्यामध्ये १० ते १५ किलो शेण मिसळून अशा द्रावणात ऊस बेणे १० ते १५ मिनिटे बुडवावे. केवळ बेणे प्रक्रियेमुळे ऊस उत्पादनात हेक्टरी ८-१० टनांची वाढ होते.

एकात्मिक खत व्यवस्थापन –
१) हिरवळीची खते – मुळावर गाठी असलेली व गाठी नसलेली दोन्ही प्रकारची हिरवळीची पीके खतामध्ये वापरता येतात. उदा. ताग, धैंचा, चवळी, गवार, मूग, उडीद, गिरीपुष्प.
२) जैविक खते – वरील प्रमाणे
३) सेंद्रिय खते – २५ टन प्रति हे. शेणखतासोबत ५० कि. गंधक मिसळून द्यावे.

४) रासायनिक खते –
सुरू ऊस लागवडीसाठी प्रतिएकर खताची मात्रा
शेणखत २० टन २०:२०:००, एसएसपी, एमओपी व युरियाच्या माध्यमातून द्यावयाची खते.
अ. क्र. खते देण्याची वेळ युरिया (कि.) २०:२०:० एसएसपी (कि.) एमओपी (कि.)
१) लागवडीच्या वेळी – ५० ८२ ४०
२) ६-८ आठवडे ८७ – – –
३) १२-१६ आठवडे २२ – – –
४) २० आठवडे – ५० ८२ ४०
एकूण खत मात्रा १०९ १०० १६४ ८०

५) सूक्ष्म अन्नद्रव्ये –
चुनखडीच्या जमिनीत किंवा क्षारयुक्त व चोपण जमिनीत २५ किलो प्रतिहेक्टर प्रत्येकी झिंक व फेरस सल्फेट आणि ५ किलो बोरॉन शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.

तण व्यवस्थापन –
– ॲट्राझिन ५ किलो प्रतिहेक्टरप्रमाणे ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर ४-५ दिवसांनी फवारणी करावी.
– दुसरी फवारणी ३० दिवसांनी २-४ डी ३.७५ किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून हुड लावून करावी.
– गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात.

पाणी व्यवस्थापन –
पाणी हा ऊस उत्पादनातील खतानंतर निर्णायक घटक असून, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन वापरावे.
ठिबकमधून द्यावयाची पाण्याची मात्रा (लिटर/ तोटी/ दिवस)
अ. क्र. महिना — पाण्याची गरज
१) लागवडीच्या वेळी – ५३ ८२ २२
२) ६-८ आठवडे ८७ – – –
३) १२-१६ आठवडे २२ – – –
४) २० आठवडे – ५३ ८२ २२
एकूण खत मात्रा १०९ १०६ १६४ ४४

संपर्क – ०२४५२ – २२९०००
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: