‘लंकाधीश रावणाने’ घेतला जगाचा निरोप; अरविंद त्रिवेदी यांचं निधन

अरविंद त्रिवेदी यांच्यावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार.

मंगळवारी ​​रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अरविंद त्रिवेदी यांचा मृत्यू झाला.

त्रिवेदींनी 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मुंबई : टीव्ही जगतातील लोकप्रिय ठरलेली रामायण मालिकेत रावणाची (Ravan)ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचे निधन (Passes Away) झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. ज्याला लोकांनी चांगलीच पसंती दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद त्रिवेदी यांच्यावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, मंगळवारी ​​रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पुष्टी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही केली आहे. अरविंद त्रिवेदी यांनी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. कौस्तुभ त्रिवेदी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. गेल्या 3 वर्षांपासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. या काळात त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. ते महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मात्र मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

रामायण’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेल्या आणखी अनेक भूमिकांचंही खूप कौतुक झाले. त्यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम और बैताळ’ मध्येही काम केले. या मालिकेनंही छोट्या पडद्यावरही बराच काळ वर्चस्व ठेवले होते. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अरविंद त्रिवेदी यांना गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळाली, जिथे त्यांनी 40 वर्षे योगदान दिले. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळालेत.चित्रपट निर्माते के अमर यांनीही ईटाइम्सला बातमीची पुष्टी केली होती त्यांनी त्रिवेदीसोबत एका चित्रपटात काम केले आहे. ते म्हणाले, “ते एक अतिशय चांगले व्यक्ती होते आणि त्याला विनोदाची उत्तम जाण होती. त्याने गुजराती चित्रपट ‘मातेमा बीजा वगदाना वा’ मध्ये काम केले, जे कदाचित त्याच्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक होते.”

त्रिवेदींनी 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. 2002 मध्ये, त्यांना सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी खासदार पदही भूषवले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: