आज पासून गणरायाच्या उत्सवाला सुरुवात होत नाही तेच पुन्हा एकदा मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडळात धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात एका महिला भाविकाला सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. गेली दोन वर्षे कोविड संसर्ग निर्बंधांमुळे गणेशोत्सवावर मर्यादा होती.
मात्र आता नव्या सरकारने निर्बंध हटवले असल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन होतं आहे. तर मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची एकच गर्दी उसळली आहे. आज सकाळपासून भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी एका महिला भाविक आणि सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी जास्त वेळ रांगेत थांबू द्यावी, अशी मागणी या महिलेनं केली. पण, गर्दी जास्त असल्यामुळे महिला भाविक आणि सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. पर्यायाने याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी महिला भाविक आणि सुरक्षारक्षांना बाजूला केले. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.