लग्नात दिवंगत वडिलांचा पुतळा बघून नवरीला अश्रू अनावर

 

वडील – मुलीचे नाते खूप खास असते. या सुंदर नात्याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाडक्या बहिणीला लग्नामध्ये दिवंगत वडिलांची कमी भासू नये म्हणून भावानं वडिलांचा हुबेहूब पुतळा बहिणीला भेट दिला.वडिलांचा पुतळा बघून नवरीला अश्रू अनावर झाले. हे दृश्य बघून लग्न मंडपातील प्रत्येक जण भावुक झाला होता.

तामीळनाडूच्या कल्लाकुरिची जिह्यातील थिरुकोविलूर भागात असलेल्या थानाकानंदल गावात ही अनोखी घटना घडली. या गावात राहणारे सुब्रमण्यम अवुला यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. अलीकडेच सुब्रमण्यम यांची मुलगी माहेश्वरी हिचं थाटामाटात लग्न झाले. लग्नात वडील आपल्या सोबत नसणार यामुळे माहेश्वरी खूप दुःखी होती. त्यामुळे माहेश्वरीचा भाऊ आणि आई यांनी तिला लग्नाची खास भेट देण्याचे ठरवले. त्यांनी माहेश्वरीच्या वडिलांचा मेणाचा पुतळा बनवण्याचे ठरवले.

पुतळा कर्नाटक येथे तयार करण्यात आला आहे . तो बनवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. जेव्हा माहेश्वरी लग्न मंडपात आली तेव्हा तिच्या वडिलांचा मेणाचा पुतळा पाहून तिला धक्का बसला. बराच वेळ ती पुतळ्याकडे एकटक बघत राहिली. त्यानंतर तिला अश्रू अनावर झाले. ती पुतळ्याच्या पायाजवळ बसून बराच वेळ रडत होती. हे संपूर्ण दृश्य खूपच भावुक करणारे होते.

Team Global News Marathi: