एकनाथ शिंदेंनी ठाकरे सुपूत्रावर साधला थेट निशाणा, संतप्त शब्दात मांडली खंत

 

मुंबई | उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. मुंबईत परत या, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन करत एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. मात्र काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदेंनी एक ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचे सुपूत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

त्यांनी आपल्या भाषणांमधून बंडखोर आमदारांविषयी अपशब्दाचाही वापर केला होता. त्यामुळे गुवाहाटीमध्ये बसलेले बंडखोर आमदार मात्र यामुळे दुखावले गेले आहेत. काय म्हणाले एकनाथ शिंदे… एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेंकडून भावनिक आवाहन.. ‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात.

आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही’अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे.

Team Global News Marathi: