कोल्हापूर | तरुणाचा पाठलाग करुन सपासप वार करत खून

 

कोल्हापूरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. या घटनेनं कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडालीय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव कुमार शाहूराज गायकवाड असं आहे. राजेंद्रनगर येथे राहणाऱ्या कुमारची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलंय. रविवारी रात्रीच्या सुमारास कुमारचा पाठलाग करुन त्याच्यावर तब्बल 20 वार करण्यात आले होते.

कुमार गायकवाड हा तरुण आपल्या मामाकडे राहत होता. नुकताच कुमारचा राजेंद्र नगर परिसरात एका टोळीतील तरुणांशी वाद झालेला. या वादातूनच विरोधी टोळीतील तरुणांनी कुमारच्या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुमार एका मॉलजवळ थांबला असता विरोधी टोळीतील काही तरुण आले. आपल्यावर हल्ला होण्याच्या भीतीने कुमारने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरांना कुमारचा पाठलाग करत त्यांच्यावर सपासप वार केले.

कुमार उड्डाणपुलाकडून टाकाळा खणीच्या दिशेने पळाला होता. त्यादरम्यान, काही तरुणांनी कोयत्यासह एडक्याने कुमारवर हल्ला केला. कुमारचा चेहरा, हात, डोकं आणि छातीवर हल्लेखोरांनी सपासप वार केले. गंभीर स्वरुपाचे तब्बल 20 वार करत कुमारची हत्या करण्यात आली. बराच वेळ कुमार घरी आला नाही म्हणून त्याच्या मामाने फोन केला. कुमार फोन उचलत नाही म्हणून अखेर शोध सुरु झाला.

या दरम्यान, कुमार एके ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या कुमारला घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सगळ्यांना धक्काच बसला. या खळबळजनक घटनेनंतर सीपीआर रुग्णालयाबाहेर एकच गर्दी जमली होती. कुमार हा आपल्या मामाचा व्यवसाय सांभाळत होता. कुमारनेही तरुणांचा एक गट तयार केला होता. खुनाच्या या घटनेनंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला.

Team Global News Marathi: