कोल्हापुर : कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे.काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी लावलेल्या परफेक्ट नियोजनामुळे भाजपला कोल्हापूर उत्तरेत चांगला पाठींबा मिळत आहे. मागच्या दोन दिवसांत भाजपला कोल्हापुरातील काही प्रमुख संघटनांनी पाठींबा दिल्याने आता सत्यजित कदम यांचा विजय सुककर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपला दोन दिवसांपूर्वी वाघाची तालीम मंडळाने पाठींबा जाहीर केला होता.
आज पुन्हा एकदा भाजपला एसटी कामगारांच्या कोल्हापूर संघटनेने आणि हिंदू एकता आंदोलन संघटनेने बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने देखील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना पाठींबा दिल्याने आता भाजपच्या मतदानात वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे. काल भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं म्हणून काँग्रेसने आंदोलन केलं होतं. मात्र महिलांच्याबाबतीत मी काहीही चुकीचे वक्तव्य केलेलं नाही. गेल्या वीस वर्षांपासून भागीरथी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच महिला वर्गाला सहकार्य केले. भाजपला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे ते असले प्रकार करत आहेत असा टोलाही धनंजय महाडिक यांनी हाणला आहे.