कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग, खासदार महाडिक यांची भेट

 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे.भारतीय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडूनही त्यासाठी हिरवा कंदिल देण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेची माहिती एरॉनॉटिकल इन्फाॅर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर प्रकाशित झाली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर अर्थातच विमानतळ 24×7 सुरु राहणार आहे.

विमानतळाच्या वैभवात भर घालणारी टर्मिनल इमारतीचे बांधकामही वेगाने सुरु असून मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे. जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाईट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एआयपी या प्रणालीवर प्रकाशित करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडू पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

अशातच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिवाळी पाडव्याला कोल्हापूर विमानतळावर अचानक भेट देत 3 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या नाईट लँडिग सुविधेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग अपग्रेड, रनवे लाइटिंग, अन्य विकास उपक्रम समजून घेतले.

दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर धावपट्टीचे 1930 मीटरपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झालं आहे. 1370 मीटर धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डीजीसीएच्या पथकाने पाहणी करून परवानगी दिली आहे.

Team Global News Marathi: