कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा पुराची धास्ती पाणी पातळी २४ तासात तब्बल १३ फुटांनी वाढ

 

कोल्हापुर | कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः मागच्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मागच्या 24 तासांत तब्बल 13 फुटांनी वाढ झाली आहे.

तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता(उत्तर) रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे. कोल्हापुरात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजता दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार दरवाडे उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे तसेच पाॅवर हाऊस मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 1423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. तसेच राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण जवळपास 90 टक्क्यांच्यावर भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे

Team Global News Marathi: