कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू, अनेक बड्या नेत्यांनी दाखल केला अर्ज

 

कोल्हापूर | विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण जिल्हावै लक्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे लागले असून या निवडणूकीसाठी अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करून आपआपले अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे आज दिवसभरात १९ उमेदवारांचे ३३ अर्ज दाखल झाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या सहकारी बँक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असताना, काही संस्था न्यायालयात गेल्याने जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. नुकत्याच सांगली आणि सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडल्या. पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया जेथून थांबली, तेथून पुढे सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

राष्ट्रवादीची सत्ता व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेच्या १२ तालुक्यांतील विकास संस्था गटातून १२, तर इतर गटांतून ९ अशा एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर, ५ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार असून, ७ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
सोमवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी कागल तालुका सेवा संस्था गटातून हसन मुश्रीफ यांनी, तर कृषी-पणन गटातून खासदार संजय मंडलिक यांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा सेवा सोसायटीतून अर्ज दाखल केला.

Team Global News Marathi: