कितीही दबाव आणा, झुकणार नाही; २०२४ मध्ये दिल्लीत बसणारच!

 

मराठी भाषा कधीच थांबणार नाही आणि कुणासमोर झुकणारही नाही. अगदी छत्रपती शिवरायांच्या काळातही दिल्लीला झुकवणारी आपली मराठी भाषा आहे. त्यामुळे कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आजदेखील ती दिल्लीसमोर झुकणार नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचा प्रयत्न केला तरी घाबरण्याचे कारण नाही. 2024 मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच, असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिन सोहळय़ात व्यक्त केला.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृह येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शानदार सोहळय़ाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासंघाचे माजी अध्यक्ष सुधीर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी भाष्य केले होते मात्र दुसरीकडे या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचा आक्रमकपणा पुन्हा एकदा दिसून आला होता.

यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव महासंघ सरचिटणीस खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, विनोद घोसाळकर, आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे, चंदूमामा वैद्य, इंडियन ऑइलचे कार्यकारी व्यवस्थापक उमाकांत प्रसाद सिंग, महाव्यवस्थापक विजय गवारे उपस्थित होते.

Team Global News Marathi: