खोक्याची ताकद लावून विरोधकांनी निवडणूक जिंकली, खडसेंचा थेट गिरीश महाजनांवर आरोप 

जळगाव जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या संघर्षात मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदारही एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले होते. या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला असुंन पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
खडसेंचे वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला आहे. विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आहे. त्यापर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही. आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.
Team Global News Marathi: