रिधोरे येथे टेम्पोच्या धडकेत तरुण तलाठ्याचा मृत्यू

रिधोरे येथे टेम्पोच्या धडकेत तरुण तलाठ्याचा मृत्यू

कुर्डुवाडी: कुईवाडी कुईवाडी बार्शी रोडवर रिधोरेजवळ पाठीमागून टेम्पोची धडक बसल्याने एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रिधोरे गावच्या न्यू इंग्लिश स्कूलजवळील रस्त्यावर घडली.

रिधोरे (ता. माढा) गावचे तलाठी मधुकर दादा काळे हे आपल्या सजातील तांदूळवाडी गावातील काम उरकून आपला मदतनीस समाधान महावीर गायकवाड (वय ३६, रा. रिधोरे) याच्यासमवेत दुचाकी (एमएच ४५ वाय ८११०) वरुन आपल्या रिधोरे येथील कार्यालयाकडे येत होते.

वाटेतील खड्डा चुकवताना पाठीमागून बीडहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच ०४ ईवाय ४१७४) ने भरधाव वेगात येऊन तलाठी काळे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
यामध्ये सुमारे ३५० ते ४०० फूट दुचाकी टेम्पोखाली फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील तलाठी काळे व त्यांचा मदतनीस गायकवाड हे गंभीर जखमी झाले. लागलीच त्यांना गावकऱ्यांनी व अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी उपचारासाठी बार्शी येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान तलाठी मधुकर काळे यांचा मृत्यू झाला, तर मदतनीसावर उपचार सुरू आहेत.यामध्ये टेम्पोचालक व क्लिनर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता पळून गेले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: