खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील: गिरीश महाजनांचा इशारा

 

जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात मोठा वाद पेटला आहे. जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले होते.मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत मतं देऊ नका, असेही खडसे म्हणाले. खडसेंच्या आरोपांवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील, असा इशारा महाजन यांनी दिला. खडसे विनाकारण सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम त्यांनी करत राहावं. माझं काम लोकांसमोर आहे. मात्र, त्यांनी जे केलंय ते लवकरच समोर येईल, असे महाजन म्हणाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही खडसेंवर निशाणा साधला आहे. आधीच्या सरकारने ४२ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. ती आम्ही उठवली आहे. एएनओसी मिळत नसल्यानं रस्त्यांची कामं थांबली होती. मात्र, आता ही कामं सुरू झाली आहेत. खडसेंनी आजपर्यंत काही केले नाही, असा घणाघात पाटील यांनी केला.

Team Global News Marathi: