‘केतकीचा मला अभिमान, कारण…’, सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन

 

अभिनेत्री केतकी चितळे केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन दिलेलं आहे. रयत क्रांती संघटनेनं केतकीनं केलेल्या पोस्टचं समर्थन केलं आहे. केतकी चितळेचा आम्हाला अभिमान आहे, असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

खोत म्हणाले की, “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे”, असं सदाभाऊ खोत म्हणाले. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना खोत म्हणाले की, “सरकार पुरस्कृत दहशतवाद राज्यात वाढवता कशाला? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं”, असा जोरदार हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

Team Global News Marathi: