भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून आपल्या आणि पक्षाच्या अडचणी वाढवण्याचे काम करताना दिसून येतात अशातच आता स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या नियोजन बैठकीत भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्याने प्रेषित मोहंमद पैगंबर यांची तुलना सावरकर यांच्याशी करून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर कारवाईची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांत केली.
सांगलीत दोन आठवड्यांपूर्वी सावरकर गौरव यात्रेपूर्वी भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली. या बैठकीत मिरजेतील भाजप अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी शाहनवाज सौदागर यांनी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली नव्हती, त्यांनी चातुर्य दाखवले होते. सावरकरांप्रमाणेच प्रेषित मोहम्मद पैगंबर हेसुद्धा त्रासाला कंटाळून मक्का सोडून गेले होते, असे वक्तव्य करून शाहनवाज सौदागर यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी नेत्यांना खूश करण्यासाठी मुस्लिम व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रमजान महिन्यात हा प्रकार करणाऱ्या शाहनवाज सौदागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी एमआयएम व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मिरज शहर पोलिसांत निवेदनाद्वारे केली. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, शकील पिरजादे, राष्ट्रवादीचे जैलाब शेख, जहीर मुजावर, नासिर शेख, मुसा समडोळे, अरकान बेग, सुलेमान मुजावर, सज्जाद बेपारी, फारुक बागवान, असलम मुल्ला उपस्थित होते