काय सांगता | अमेरिकेत निर्मला सीतारामन आणि अन्य 14 जणांचा ‘वॉंटेड’ असा उल्लेख

 

नवी दिल्ली | अमेरिकेतील वॉल स्ट्रिट जर्नल या वर्तमानपत्रात भारताच्या विरोधातील एक जाहिरात पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यात भारताला लक्ष्य करताना गुंतवणुकीसाठी सगळ्यांत असुरक्षित देश असा भारताचा उल्लेख करण्यात आला आहे. एका संघटनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह 14 जणांची नावेही देण्यात आली आहेत.

वॉंटेडचे पोस्टर जसे छापतात त्या प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सीतारामन आणि अन्य ज्या लोकांची नावे त्यात छापण्यात आली आहेत ते लोक भारतातील घटनात्मक संस्थांचा राजकीय आणि उद्योग जगतातील विरोधकांना लक्ष्य करण्याकरता शस्त्रासारखा वापर करतात असा आरोप करण्यात आला आहे. गुंतवणूदारांनी गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतापासून दूरच राहावे, असा सल्लाही त्यात देण्यात आला आहे.

अमेरिकेने भारतावर आर्थिक आणि व्हिसा प्रकरणात निर्बंध लादण्याची मागणीही जाहिरातीत करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच ही वादग्रस्त जाहिरात देण्यात आली आहे. यात ज्या लोकांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे त्यात भारताचे सॉलीसीटर जनरल तुषार मेहता, अतिरिक्त सॉलीसीटर जनरल एन. वेंकटरमण, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या नावांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे विशेष न्यायाधीश चंद्रशेखर, ईडीचे संजय कुमार मिश्रा आणि आर. राजेश, केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे आशिष पारीख तसेच ईडीचे ए. सादीक मोहम्मद यांची छायाचित्रे प्रसिध्द करण्यात आली आहेत.

Team Global News Marathi: