कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा, आव्हानाची भाषा असेल तर… ; राज ठाकरेंचा इशारा

 

महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावादाचा प्रश्न पुन्हा कुणीतरी पेटवला आहे. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना खडेबोल सुनावले.

तसेच सीमावादाचा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा,असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादाचा प्रश्न चर्चेने सोडविला जावा. पण जर समोरून हिंसा करण्यात येत असले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका.

तसेच येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जात आहे. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचे , असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्र सरकारलाही या मुद्द्याकडे लक्ष घालण्यास सांगितले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावले. सरतेशेवटी संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे,असेही ते म्हणाले.

 

Team Global News Marathi: