सीमावादाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद; सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन निर्माण झालेला तणाव कायम असून बुधवारी देखील राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले असून अनेक ठिकाणी कर्नाटकच्या एसटी बसेसना काळे फासत नागरिकांनी संताप व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती केली आहे.

सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर आमचे उत्तरही तितकेच तीव्र असेल, असा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. याशिवाय कोल्हापुरात महाविकास आघाडीची बैठक होऊन येत्या शनिवारी शाहू महाराज समाधीस्थळी व्यापक आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले.

सौंदत्ती यात्रेला गेलेल्या भाविकांना कडक पोलिस बंदोबस्त बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर व महाराष्ट्रातून दाखल झालेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बुधवारी कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या दैनंदिन १ हजार १५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या सूचना येईपर्यंत अंशत: रद्द केल्या आहेत.

कोल्हापुरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणाऱ्या ५७२ फेऱ्यांपैकी ३१२ फेऱ्या रद्द केल्या. सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात जाणाऱ्या ६० फेऱ्यांपैकी २२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील ४८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागात होत असलेला हिंसाचार व तणावाच्या स्थितीवर तातडीने चर्चा व्हावी, यासाठी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत तर काँग्रेसचे खासदार कुडूकुनील सुरेश यांनी बुधवारी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिले होते. हे प्रस्ताव राज्यसभेत सभापतींनी तर लोकसभेत अध्यक्षांनी नाकारले. राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा असल्याने हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही, असे सभापती जगदीप धनखड यांनी म्हटले.

 

Team Global News Marathi: