कंगना राणावतच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले

 

मुंबई | भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रानौत हिने केले होते. कंगनाच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही टीका करण्यात आली होती. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यावरुन संताप व्यक्त केला आहे. तसेच तिला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घेण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

‘फासावर गेलेल्या सर्व क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं? भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले पाहिजे. गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे,’ अशा शब्दांत संजय राऊतांनी नाराजी जाहीर केली आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘अनेक स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आले आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपाला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल. कंगनाला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजेत. अन्यथा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हक्क आता भाजपाला राहिलेला नाही असेही त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: