एकीकडे शिंदे आणि भाजपा गटाचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल होत असताना दुसरीकडे मनसेचे एकमे आमदार राजू पाटील यांनी थेट शिंदे गटवार हल्ला चढवला आहे यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातील अनेक कामांवर बोट ठेवत थेट टीका केली होती आता पुन्हा एकदा २०२४ च्या खासदारकीवरून आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
“कल्याणचा पुढील खासदार मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही,” असा दावा आमदार राजू पाटील यांनी केला आहे. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की, असं राजू पाटील म्हणाले. सोबतच त्यांनी शिंदे गटातील घराणेशाही आणि पालकमंत्र्यांच्या निवडीवरही भाष्य केलं. ते अंबरनाथमध्ये बोलत होते.
अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानीच्या रुपातील देवीचं दर्शन घेतलं. नुकताच राजू पाटील यांचा वाढदिवस झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केक कापून पाटील यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी राजू पाटील यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पुढची निवडणूक ठाण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली, तर खासदार व्हायला आवडेल का? असं राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले ती, ‘मी आमदारकीलाही उभा राहणार नव्हतो, राजसाहेब म्हणाले म्हणून उभा राहिलो, त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर राहणार. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेची दखल घेतल्याशिवाय, मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की असे सुचक विधान त्यांनी केले होते.