कडेगावात काँग्रेसचा भाजप-राष्ट्रवादीला धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

 

महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर सत्ता नसतानाही कडेगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये आता इनकमिंग होत आहे.आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्यावर विश्वास ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत कडेगाव तालुक्यातील अमरापूर, हिंगणगाव बुद्रुक, चिंचणी, आसद, वडिये रायबाग, नेवरी, शिवाजीनगर, आंबेगाव, मोहित्यांचे वडगाव या नऊ गावातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर, आंबेगाव, वडियेरायबाग, नेवरी येथील कार्यकर्त्यांनी कडेगाव येथे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय अमरापूर, हिंगणगाव बुद्रुक, चिंचणी, आसद येथील कार्यकर्त्यांनी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. यावेळी पुष्पहार घालून या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांपासून कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये समाजातील विविध घटकांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नऊ गावांमधील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यातील काही कार्यकर्ते भाजप मधून तर काही राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले आहेत.

Team Global News Marathi: