“फक्‍त प्रस्ताव द्या, निधी आणायची जबाबदारी माझी” खासदार उदयनराजे भोसले यांचा शब्द

 

सातारा | सतत आपल्या विधानामुळे चर्चेत राहणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे साताऱ्याच्या सावंगीण विकासावर सुद्धा लक्ष देऊन असतात. याच प्रचिती पुन्हा एकदा रविवारी साताऱ्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात दिसून आली होती. साताऱ्याच्या विकासाच्या कळीच्या मुद्‌द्‌यावर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उदयनराजेंनी थेट तरुणाईशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापार, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल, चित्रपट, आरोग्य, उद्योग आदी क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. रंगकर्मी राजीव मुळ्ये व तनया भुर्के यांनी उदयनराजेंना बोलते केले. उदयनराजे म्हणाले, पूर्वीच्या काळी सुविधांच्या अभावामुळे सातारकरांना पोटापाण्यासाठी पुणे, मुंबईत स्थलांतरित व्हावे लागले. सृजनात्मक विचार आणि कृतीतून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभे केले. तोच विचार साताऱ्याच्या पुढील वाटचालीसाठी करायचा आहे.

माहिती तंत्रज्ञान, तंत्रशिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी ‘संवादसेतू’ निर्माण व्हायला हवा. सातारा एमआयडीसीत रोजगार यायला हवा. येथे ४७ एकरावर वसलेली महाराष्ट्र स्कूटर कंपनी पुन्हा सुरू होण्यासाठी पाठपुरावा करू. उद्योजकांना स्वस्त वीज मिळण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तुम्ही प्रस्ताव द्या, ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेऊ. सातारा शहराच्या पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीचे अनेक प्रस्ताव आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून या प्रस्तावांचा पाठपुरावा करू असे विधान त्यांनी या कार्यक्रमात केले होते.

Team Global News Marathi: