जेलमध्ये असताना राऊतांवर इतर कैद्यांचा प्रभाव पडला असावा

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील वादावर आज माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले. आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथले षंढ आणि नामर्द शिंदे सरकार गप्प का बसले? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारणा करा. आता हे चालणार नसल्याची टीका केली होती.

मात्र राऊतांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही भाषा संजय राऊतांना शोभत नसून जेलमध्ये राहिल्याने इतर कैद्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला असावा असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारने अडीच वर्षांत हा वाद का सोडवला नाही, असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी बेळगावात न जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे हे सरकार षंढ आहे, नामर्द आहे, अशी भाषा वापरने संजय राऊतांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची हिंमत शिंदे-फडणवीसांमध्ये आहे, हे राऊतांना चांगल्याने माहिती आहे. वास्तविक पाहता प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे सामाजिक वातावरण अशांत करून होत नाही, असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना दिले.

“मागील अडीच वर्षे तुम्ही सरकार चालवत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मग सीमाप्रश्नी त्यांनी काय प्रयत्न केले? हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना सीमाभागात तणाव निर्माण करून हा प्रश्न सुटणार नाही. एसटी फोडणे, गाड्या फोडणे, हे लोकशाहीची लक्षणे नाहीत. त्यांनी गोटा मारला म्हणून आपण वीट मारायची हे योग्य होणार नाही. यापेक्षा मी सरकारला विनंती केली आहे की, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी आणि हा विषय लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

 

Team Global News Marathi: