जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजपा नेत्याचं सूचक विधान

 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर येत्या काही दिवसांत भाजपचा झेंडा फडकताना दिसेल.” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही फुटणार का? याची चर्चा सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील सभेला संबोधित करताना हे विधान केले.

“राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लागतो. हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असे मी विश्वासाने सांगतो. राष्ट्रवादीचे ९० टक्के कार्यकर्ते आपल्याला भाजपमध्ये जावे लागेल, असेही म्हणतील. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यालय आहे, तिथे नेमका झेंडा कुणाचा लावावा? असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोक आता भाजपमध्येच जाऊया, असे म्हणतील.” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून हा पक्ष फोडला. त्यांचे दुसरे टार्गेट राष्ट्रवादी असू शकते, असे मी बोललो होतो. शरद पवारांच्या (मार्गदर्शनाखाली कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. राष्ट्रवादी फोडणे सोपे नसून त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. त्यांना लोकशाही माहीत नाही. त्यांना फक्त ठोकशाही माहीत असल्यामुळे त्यांचे दुसरे लक्ष्य कदाचित राष्ट्रवादी असेल.” असेही त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: