राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू

 

गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, मनसेने शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावरून महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले; तर आम्ही युतीसाठी तयार असू.” असे त्यांनी म्हटले आहे.

“काही गोष्टी राजकारण सोडूनही बघितल्या पाहिजे. आमच्यासारख्या पक्षाला सरकारकडून जर काही सकारात्मक प्रतिसाद येत असेल, तर अशा सरकारच्या जवळ येण्यास काही हरकत नाही. मागच्या सरकारमध्ये कोणी आमच्या मागण्यांची दखल घेत नव्हते. उलट त्या मागण्या पूर्ण कशा होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे जवळीक वाढली आहे.” असेही ते म्हणाले.

भविष्यात भाजप-शिंदे गट आणि मनसे युती होणार का? याबाबत बोलताना, “भाजप-शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये होण्याऱ्या भेटीगाठींचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मात्र, अशी युतीबाबत परिस्थिती निर्माण झाली. तर युती करायला हरकत नाही. अशी वेळ आली आणि राज ठाकरेंनी होकार दिला; तर आम्हीही त्यासाठी तयार असू.” असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Team Global News Marathi: