“जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं”

 

नवी दिल्ली | आशिया चषक स्पर्धेचा थरार २०२३ मध्ये पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. अशातच मंगळवारी बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या धरतीवर होणारा पुढील आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची आमची मागणी असेल. असे जय शाह यांनी म्हटले.

यापूर्वी 2008 साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर सडकून टीका केली असून नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, भारत-पाकिस्तानचा सामना जगात सर्वाधिक पाहिला जाणारा सामना आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये राजकारण न आणता दोन्ही देशांनी एकमेकांच्या धरतीवर क्रिकेट खेळायला हवे असे पाकिस्तानच्या संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने म्हटले. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी येत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या संघानी पाकिस्तानात मालिका खेळली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही म्हणून आम्ही क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही पण येणाऱ्या पिढीचे नुकसान होणार आहे, असे अकमलने अधिक म्हटले.

Team Global News Marathi: