जालन्यात नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचं उघड,15 पाकिटे नशेच्या गोळ्या जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी जालना | जालन्यात ‘नायट्रासेन’ या नशेच्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल विधानसभेत नशेच्या गोळ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आणि सापळा रचुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. शेख सोहेल शेख शकील आणि कलदरसिंग टाक अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून 15 पाकिटे गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

नवीन जालना भागातील दोन तरुण नायट्रासेन या बेकायदेशीर रित्या गोळ्या आणून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकता येत नसतांनाही हे दोन तरुण एमआरपीपेक्षा जास्त दराने विकत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.

Team Global: