जलील काय शहराचा बादशाह आहे का? औरंगाबादचं लवकरच संभाजीनगर होणार

 

औरंगाबाद | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. यावर आता, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच, असे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी, जलील म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. त्यांनी काल बैठकही घेतली, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. संजय राऊतांसारखे खोटे नाही. संजय राऊत मागे म्हणाले होते, की प्रस्ताव गेला आहे. मग आता प्रस्ताव घ्यायची गरज काय पडली? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.

शिरसाट म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. यासाठी केंद्राकडून मान्यता आणावी लागते. केवळ प्रस्ताव घेऊन नसतं होत. याला तातडीने मान्यता आणणार आणि असे किती जरी आडवे आलेना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच. आमच्या मनात कसलेही दुमत नाही आणि आता ही घोषणा राहणार नाही. याची अंमलबजावणी तुम्हाला महिनाभरातच दिसून येईल.

Team Global News Marathi: