“नासक्या भाजीबद्दल काय बोलावं?”; गुलाबराव पाटलांची राऊतांवर टीका

 

जळगाव | राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“नासक्या भाजीबद्दल काय बोलावं?” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

तसेच “आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही. आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत” असं म्हटलं आहे. आता राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला ते काय प्रतिउत्तर देतायत हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: