मुंबई | भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मंत्रालयात जाऊन फाईल्स पाहतानाचा एक फोटो व्हायरल झाला असून, याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाकडून सोमय्यांना नोटीस देण्यात आल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. ‘मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. व्हायरल झालेल्या फोटोबाबत खुलासा करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सोमय्यांना देण्यात आलेली नोटीस ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे.
‘मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले, तर त्यासाठी थेट माहिती मागणार्यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा’, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.