संपूर्ण राज्यभरात झपाट्याने कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर पडताना दिसत आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून केंद्र सरकारकडून विविध उपायोजना राबवल्या जात आहे. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच आता कुख्यात गुंड छोटा राजन याला तिहार तुरुंगात कोरोनाची लागण झल्याचे वृत्त समोर येत आहे.
छोटा राजन याच्यावर कोरोना संसर्गावरील पुढील उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मध्ये दाखल केले गेले आहे. तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी सोमवारी येथील सत्र न्यायालयात ही माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे, इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पणानंतर २०१५ मध्ये अटक झाल्यापासून ६१ वर्षाच्या राजन दिल्लीच्या तिहार तुरूंगात बंद आहे.
आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य माणसाला ऑक्सिजनची कमतरता आणि रुग्णालयात बेड हवाय. रुग्णांची कुटुंब अस्वस्थ आहेत. अशी परिस्थिती असताना अंडरवर्ल्ड डॉनला रुग्णालयात बेड कसा मिळाला ? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राजनच्याविरोधात मुंबईत दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. त्याला कोरोना संसर्ग झाल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले.