चिपी विमानतळाच्या उद्घाटन: मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे यांनी एकमेकांना अशा मारल्या कोपरखळ्या

सिंधुदुर्ग: चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी सर्वांदेखत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरुन लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘सिंधुदुर्गाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कोणीतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता. साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे नारायण राणेंनी म्हटले होते.

या टीकेला उद्धव ठाकरे यांनीही खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.

‘तुमच्या कॉलेजसाठी फोन केलात तेव्हा दुसऱ्या क्षणाला फाईलवर सही केली’

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मी विकासाच्या कामात पक्षभेद आणत नसल्याचे ठासून सांगितले. नारायण राणे यांना आठवत नसेल, पण तुमच्या महाविद्यालयाच्या वेळी तुम्ही मातोश्रीवर फोन केला होतात तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी फाईलवर सही केली होती. कारण, हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या, जनतेच्या भल्यासाठी होते, असे उद्धव यांनी सांगितले.

‘खोटं बोलणाऱ्या लोकांना बाळासाहेबांनीच त्यावेळीच शिवसेनेतून बाहेर काढले होते’

नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी राणेंची चांगलीच हजेरी घेतली. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

‘लघू का असेना सुक्ष्म का असेना पण तुम्हाला मोठं खातं दिलंय’

आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

नारायण राणे म्हणाले…

मी नाव घेतलं तर राजकारण होईल

उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल.

कोण अडवत होतं. विचारा जरा

अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा.

अजित पवारांनी 100 कोटी दिले

सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिले. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.

…पण ती माहिती चुकीची

स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. प्रोटोकॉल जरुर पाळा. तुम्हाला सर्व माहिती मिळते, ब्रीफ होतेय. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात.

चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू

बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांना थारा नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं ते म्हणाले.

90 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं

पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांनी यावं. पाच सहा लाख खर्च करावेत, त्यामुळे सिंधुदुर्गाच्या वासियांना रोजगार मिळावा. या हेतूने हे विमानतळ व्हावं हा हेतू होता. 90 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती.

अडीअडचणीला मी धाऊन गेलो

इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: