उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सरकार बनवतोय, अखिलेश यादव यांचा ट्विट करून दावा

 

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेशात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजप आणि समाजवादी पक्षाकडून सत्ता बनवण्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोल काहीही असो उत्तर प्रदेशमध्ये सरकार आम्हीच बनवणार असा दावा आता समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. त्यानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार बनवणार असं सांगण्यात येतंय. त्यावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं आहे की, “सातव्या आणि निर्णायक टप्प्यामध्ये समाजवादी पक्षाच्या आघाडीला बहुमत देणाऱ्या सर्व मतदारांचे आणि विशेषत: युवा वर्गाचे आभार. आम्ही सरकार बनवतोय.”

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय.

Team Global News Marathi: