“संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?

 

मुंबई | कोकणासह पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र कोकणसाठी दुर्दैवी ठरली आहे. आकाशातून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून ८५ जणांचा बळी गेला.

याच दरम्यान कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. दरम्यान हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी शुक्रवारी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही.

याच दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळकुटे मंत्री” असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

“आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ऑक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले? हे तर पळकुटे मंत्री आहेत” अशी शब्दांत चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

Team Global News Marathi: