पुणे पदवीधर मतदार संघात सांगली जिल्ह्यातील दोन मातब्बरात होणार निवडणूक

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा करतानाच लाड यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

अरुण लाड यांची लढत भाजपने सांगली जि प चे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्याशी होणार असून याशिवाय आणखी कोण कोण उमेदवारी रिंगणात उतरतात याकडे पदवीधरांचे लक्ष लागले आहे. यामुळे या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि कुंडल येथील क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या या दोघांत जोरदार लढत होणार आहे.

 

संभाजी ब्रिगेडही या निवडणुकीत उतरली असून श्रीमंत कोकाटे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तर अभियंता मनोज गायकवाड हे ही उमेदवार निवडनुक रिंगणात असणार आहेत. एका बाजूला तरुण संग्राम देशमुख, श्रीमंत कोकाटे तर दुसऱ्या बाजूला बुजुर्ग अरुण लाड अशी लढत होत असून पदवीधर कुणाला पसंती देतात ते लवकरच स्पष्ट होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनवेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे पक्षाची हॅट्रिक करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे ही निवडणूक आता लाड आणि देशमुख यांच्यात होणार आहे.

 

सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने चांगली बांधणी केली आहे. यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या निवडणुकीत सारंग पाटील आणि अरुण लाड या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारात मतांची विभागणी झाल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. लाड यांना जवळपास सारंग पाटील यांच्या बरोबरीने मते पडली होती.यामुळे यावेळी बंडखोरी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते काळजी घेत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: