किरण मानेंच्या मार्गात अडथळे आणणारा ‘तो’ व्यक्ती कोण ?

 

मुंबई | “वरवर पुरोगामीत्व दाखवत एका पक्षाच्या आधारानं निवडून आलेला, पण छुपी विचारधारा ‘नासकी’ असलेला एक ‘नव’पुढारी… वरवर छाती फुगवून शूरवीर असल्यासारखा आव आनत फिरनारा, पन ‘ॲक्च्यूअलमधी’ लै लै लै फडतूस भुरटा असलेला लोकप्रतीनिधी, माझ्या रस्त्यावर जाईल तिथं अडथळे आनतोय..”असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केलाय.

काय लिहिले आहे आपल्या फसेबूक पोस्टमध्ये वाचा !

मी लढतोयच भावांनो…सुट्टी नाय देत… शत्रू कितीबी अक्राळविक्राळ असला तरी सच्चा मानूस जिंकतो, यावर इस्वास हाय माझा… पन माझ्या लढ्यात एक लै भारी मज्जा चाललीय गड्याहो. तुमाला सांगीतल्याशिवाय रहावत नाय.. एक ‘घरचा भेदी’ हात धूवून माझ्या मागं लागलाय… मला तुकोबारायाचा अभंगच आठवला ! सांगतो.. अभंग सांगतो.. पन आधी गंमत सांगतो.

…वरवर पुरोगामीत्व दाखवत एका पक्षाच्या आधारानं निवडून आलेला, पण छुपी विचारधारा ‘नासकी’ असलेला एक ‘नव’पुढारी… वरवर छाती फुगवून शूरवीर असल्यासारखा आव आनत फिरनारा, पन ‘ॲक्च्यूअलमधी’ लै लै लै फडतूस भुरटा असलेला लोकप्रतीनिधी, माझ्या रस्त्यावर जाईल तिथं अडथळे आनतोय.. आपल्यापुढं वेगळी नाटकं करून, आपल्या मतांच्या जोरावर सर्वोच्च विधीमंडळात बसनारा हा भंपक माणूस, ज्याला मी भेटंल त्याला फोन करून माझी बदनामी करायचा प्रयत्न करतोय… आवो, माझ्या इरोधी विचारधारा असलेल्या नेत्यांनी केली न्हाईत एवढी कारस्थानं चालवलीयेत त्या बांडगुळानं !!!

…मी बी सातारी मातीतला वाघ हाय.. आडवा यिल तिथं हेलपाटतोय त्याला…उचलून आपटतोय.. शेवटी मी त्याला ‘पुरून उरीन’, ते सोडाच. तुमाला त्याचं नांवबी सांगीन. पन आत्ता तुमी मात्र जागे व्हा. हीच वेळ हाय. भावनिक होऊन नको ती बेनी उरावर घेत जाऊ नका. मानसाची पारख पायजे. सगळ्या क्षेत्रात ह्या असल्या सडक्या आंब्यांनी चांगल्या विचारांच्या संस्था-कंपन्या आनि पक्षबी खिळखिळे केल्यात. विरोधक सत्तेत असन्याचं कारन त्यांच्या कर्तृत्त्वात नसून, ‘स्वकियांच्या’ नाकर्तेपनात आनि गद्दारीत हाय !

आवो, मी तर लै सामान्य मानूस हाय. तुकोबारायासारख्या महान संताच्या लढ्यातबी असल्या अस्तनीतल्या सापांनी लै विष ओकलं असनार गड्याहो…उगं त्याला ह्यो अभंग सुचला आसंल व्हय? शेतकर्‍याचं उदाहरन दिलंय तुकोबारायानं… पिकाला पाणी देण्यासाठी पाट असतो… दंड बी म्हन्त्यात काही ठिकानी त्याला..तर, त्या पाटात एखांदी काडी पडली आन् कुठंतर अडकली.. तर मागनं वहात येनारा कचरा, पालापाचोळा, बारीक काड्या त्या काडीला अडकत्यात… पानी तुंबायला लागतं..फुगून पाटाबाहेर येतं.. नको तिथं जाऊन चिखल होतो.. ज्यासाठी पाट बनवलाय, त्या पिकाला पानी मिळतच नाय… नासाडी होती.

“आड पडे काडी । तरि तें बहुत पाणी खोडी ।।
दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ।।
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ।।
तुका म्हणे रांड । ऐसी का ते व्याली भांड ।।”

…पाटाच्या पाण्याच्या प्रवाहात एखादी काडी आडवी पडली तरी ती खूप पाणी वाया घालवते.
…त्याचप्रमाणे एक दुर्जन संगतीला असला, की अनेकांचा घात होतो.
…दुधाच्या हंड्यात एक माशी पडली तरी सगळं दूध नासतं.
…शेवटी तुका म्हणे : म्हणतात ती बाई कमनशिबी असेल, नाहीतर अशा कळलाव्या भांडाला तिनं का जन्म दिला असता???

…कायकाय मानसांना प्रामानिक मानसाविरोधात कारस्थान करन्यातच आसुरी आनंद मिळतो. स्वतः तर काय भलं करायचं नाय…आन् कुनी करत आसंल तर त्याला खोडा घालायचा… पाटात पडलेल्या काडीगत ! लै लै लै धुर्त आनि लबाड असत्यात.. सोत्ताचा स्वार्थ साधन्यासाठी कुनाच्याबी पाठीत खंजीर खुपसायला कमी करत न्हाईत. दोस्तांनो, ही सख्ख्या आईबापाला उपयोगाला येत होत न्हाईत..दूसर्‍याच्या काय येत्याल?

…अशा व्यक्ती एखाद्या प्रामानिक मानसाला एकटं पाडून त्याचा घात करत्यातच, पन नकळत ही मानसं अनेक संस्था, संघटना, पक्ष मोडकळीला आनत्यात.. त्यांच्या खालच्या इतर निष्ठावान कार्यकर्त्यांची जी सळसळती ताकद समाजासाठी-रचनात्मक कामासाठी वापरली जायला पायजे, ती ताकद ह्या लोकांची कारस्थानं निस्तारून पक्ष सावरन्यात खर्च होते. या पाटातल्या काडीमुळं समाजाचं, गोरगरीबांचं, भल्या मानसांचं शोषन होतं. ज्यांच्या मतांवर हे निवडून आले, त्यांना डावलून, हे भांडवलदारांचे ‘भडवे’ बनत्यात.. त्यांच्या पायाशी लोळन घेत रहात्यात..

..या पाटातल्या काड्या व्यक्तीगत आयुष्यापास्नं समाजापर्यन्त सगळं गढूळ करून टाकत्यात.. चिखलराडा व्हतो.. म्हनून ही काडी वेळीच काढून टाकणं गरजेचं असतं भावांनो. काडीकडं दुर्लक्ष कराल तर सोत्ताचा घात करून घ्याल ! आधीच्या पक्षाला लाथ घालून ते तुमच्या पक्षात आलेले असत्यात.. खिसं भरून घेतल्यावर तुमचा पक्ष बदलून ते जानारच हायेत, लिहुन ठेवा.. आत्ताच ठेचा… वेळ निघून गेल्यावर डोकं आपटलं तरी काय हुनार नाय !

“दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ।।” हे तुकोबारायानं कानीकपाळी वरडून सांगीतलंय. संगत लै लै लै काळजीपूर्वक निवडली पायजे.. मद्याचा एक थेंब दुधाचा अख्खा रांजन नासवतो. आपल्या कुटूंबातला एक व्यसनी-विकृत मानूस अख्खं घर उद्ध्वस्त करतो.

अजून काय सांगायची गरज हाय का?

ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

 

Team Global News Marathi: