आपण शिवरायांच्या भूमीत राहतो की, मोगलांच्या, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांचा सवाल

 

लोकसभेमध्ये आवाज उठविल्यावर एका महिला खासदाराला संसदेच्या वास्तुत शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांच्याकडून उघडपणे धमकी दिली जाण्याची घटना अतिशय वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. अशी घटना पाहिल्यावर आपण शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या अंमलाखाली राहतो आहे, असा सवाल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे. एका महिला खासदाराला संसदेच्या आवारात धमकी दिल्या गेल्या प्रकरणी ज्येष्ठ नेते शरदराव पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेची संपूर्ण महाराष्ट्र प्रतीक्षा करीत आहे, असेही श्रीमती खापरे यांनी नमूद केले आहे.

श्रीमती खापरे म्हणाल्या की, संसदेमध्ये सोमवारी नवनीत राणा यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील सद्य घडामोडीवर भाष्य केल्यानंतर संसदेच्या लॉबीमध्येच शिवसेनेच्या खासदारांकडून त्यांना ‘तू महाराष्ट्रात कशी फिरतेस ते पाहतो, आणि तुला सुद्धा तुरूंगामध्ये टाकतो’ अशी उघड धमकी दिल्याची घटना घडली. या घटनेमुळे संसदेचे पावित्र्य भंग पावलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणाचीही दखल घेणार नाहीत हे स्पष्टच आहे. आत्तापर्यंत सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना संरक्षण द्यायचे हीच जणू शपथ त्यांनी घेतली आहे. पण या घटनेवेळी संसदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनीही मौन बाळगणे अत्यंत धक्कादायक आहे.

महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. विलगीकरण केंद्रातही महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. अलीकडे लातुर जिल्ह्यात एका सरपंचाने महिलेवर अत्याचार केले, एका महिलेला ती 50 वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या घरातून ग्रामसेवकांने सामानासकट घराबाहेर काढले, सामजिक न्याय विभागातल्या अधिकाऱ्याने एका तरूणीकडून तिच्या हक्काच्या नोकरीच्या बदल्यात शरिरसुखाची मागणी केली, औरंगाबादमध्ये एका तरूणीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली, शिवसेनेच्या मंत्र्यांमुळे बीड मधल्या एका तरूणीने आपला जीव गमावला. अशा एक ना अनेक घटना घडल्या पण या सरकारने अशा घटनांतील गुन्हेगारांना संरक्षण दिले, असेही श्रीमती खापरे यांनी नमूद केले आहे.

 

Team Global News Marathi: