मुंबई : अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या चौकशीनंतर अनेक खुलासे बाहेर आले होते. त्यात अनिल देशमुखांच्या नावानंतर वाझे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांचे नाव सुद्धा या प्रकरणात पुढे आले होते.
आता या प्रकरणी मुंबईतील एका प्रसिद्ध बारमालकाचे नाव पुढे येत आहे. या बारमालकाचे नाव NIA च्या हाती लागलेल्या सचिन वाझेच्या डायरीतुन समोर आले होते. सचिन वाझे प्रकरणात तपास जवळपास पूर्णपणे संपला असल्याचे NIA ने आधीच स्पष्ट केले आहे. त्यानंतर यामधील खंडणी बारमालक महेश शेट्टी महत्त्वाचा भाग असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार NIA ने मागील आठवड्यात गिरगाव भागात टाकलेल्या धाडीत एक डायरी सापडली होती. त्या डायरीत विविध प्रकारचे आकडे लिहिण्यात आले होते. आकड्यांसह महेश शेट्टी या व्यक्तीचे नाव आढळले. हे आकडे खंडणीचे असून शेट्टीचा त्या खंडणीशी संबंध असल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्यानुसार सीबीआयने शेट्टीबाबत तपास सुरू केला आहे.