पिंपरी-चिंचवडमध्ये आज 276 नवीन रुग्णांची नोंद, 79 जणांना डिस्चार्ज, सात जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील 232 आणि शहराबाहेरील 44 अशा 276 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, आज एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या 3776 वर जाऊन पोहोचली आहे.

शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून 200 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज शहराच्या विविध भागातील 232 आणि शहराबाहेरील 44 अशा 276 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 79 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

तर, शहरातील मोहननगर चिंचवड येथील 62 वर्षीय महिला, भीमनगर पिंपरीतील 60 वर्षीय महिला, चिंचवडेनगर येथील 65 वर्षीय पुरुष, रिव्हररोड पिंपरीतील 67 वर्षीय पुरुष, निगडीतील 80 वर्षीय वृद्ध, साईनगर मामुर्डीतील 66 वर्षीय आणि महापालिका हद्दीबाहेरील शितळानगर देहूरोड येथील 58 वर्षीय पुरुष अशा सात जणांचा आज एकाचदिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 3776 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2233 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 53 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 85 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1482 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: