नवी मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. त्याच राज्यात तसेच जिल्हयातील काही भागात कोरोना संदर्भात कठोर निर्णय घेण्यात आलेले आहे.
त्यात नवी मुंबई आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही मनपा क्षेत्रात नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान दोन्ही मनपाकडून करण्यात आले आहे.
पनवेल मनपामध्ये गुरुवारी पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त ऑनलाईन बैठक झाली. सदर बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलिस परिमंडळ २चे उपायुयक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यापुढे कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस विभाग आणि महानगरपालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करतील.
नवी मुंबईतही एकंदरीत परिस्थिती पाहता कोरोना सुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असून अशाप्रकारे कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.