महाराष्ट्रात पावसाचे थैमान, आमदार कुटुंबातील पिता-पुत्र गेले वाहून;आणखीन पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाचे थैमान, आमदार कुटुंबातील पिता-पुत्र गेले वाहून;आणखीन पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात सोमवारपासून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पाणी साचणे, बांधकामाची पडझड, झाडं कोसळणे, माणसं वाहून जाणे अशा दुर्घटना घडल्या.

 

मुंबईः महाराष्ट्रात सोमवारपासून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पाणी साचणे, बांधकामाची पडझड, झाडं कोसळणे, माणसं वाहून जाणे अशा दुर्घटना घडल्या.


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत सलग तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. मराठवाड्यात तीन तर विदर्भात सहा असे नऊ जण वाहून गेले. शेतीचे नुकसान झाले. पिके वाहून गेली. दापोली शहरात पाणी आले. अनेक ठिकाणी ३-४ फुटांपर्यंत पाणी साचले होते. तब्बल ३१५ मिमी पावसामुळे दापोलीतील ७० गावांत पाणी शिरले. भरतीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली. रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये ४७५ मिमि पावसामुळे २५ गावांत पाणी शिरले. काही पूल वाहून गेले. मच्छिमारांच्या बोटीही पाण्यात वाहून गेल्या.

विदर्भात मंगळवारी पावसाने सहा बळी घेतले. शेतीचे नुकसान झाले. पिके वाहून गेली. यवत, वर्धा आणि अमरवाती या तीन जिल्ह्यांतील तेरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यवतमाळमध्ये तिघे वाहून गेले. ‘चांदूर रेल्वे’मध्ये एकजण वाहून गेला. चंद्रपूरमध्ये तीन दिवसांपासून पाऊस आहे. नागपूरमध्ये रस्ते जलमय झाले. अकोला, बुलडाणा, वाशिममध्ये पावसाने कहर केला. मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. बीड तालुक्यात कपिलधार धबधबा बघण्यासाठी गेलेले दोघे वाहून गेले. यापैकी एकाला वाचवले.

मुखेडजवल मोती नाला येथे कार वाहून गेली. या दुर्घटनेत आमदार डॉ. तुषार राठोड यांचे चुलतभाऊ भगवान राठोड आणि त्यांचा मुलगा संदीप हे दोघे वाहून गेले. चालक उद्धव देवकत्ते झाडाचा आधार घेऊ शकल्यामुळे वाचला. अन्य दोन घटनांमध्ये दोन मृतदेह सापडले.
खान्देशात जळगावमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. धुळ्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. नंदुरबारमध्ये रिमझिम पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील वाघूर आणि तापीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हा अंदाज मंगळवारी संध्याकाळी व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह किनारपट्टी लगतच्या भागाला ऑरेंज अलर्ट आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राला मंगळवार ७ सप्टेंबर २०२१ रोजी पावसाने झोडपून काढले. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पिके वाहून गेली. अनेक नद्यांना पूर आला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: