वडूज | कोरेगाव भीमा इथे आज २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली असून या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार आहे. आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा धोका वेगाने वाढतोय . चार दिवसांच्या अधिवेशनात दहा मंत्री आणि वीसहून अधिक आमदार कोरोना बाधित झालेत, असंही त्यांनी सांगितलं. तसाच लांडेवाडी येथे मज खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती शुक्रवारी रात्री रद्द करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय.