“गणेशोत्सवासाठी लागू केलेले निर्बंध शिथिल करा” ठाण्यातील मंडळाचे मनपा कार्यालयासमोर आंदोलन |

 

ठाणे | करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांविरोधात गणेशोत्सव मंडळांकडून नाराजीचा सूर उमटू लागला असून मंगळवारी सकाळी ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते.

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका कमी असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. तरीही गणेशोत्सवावर जुनेच निर्बंध का, असा प्रश्न गणेश उत्सव मंडळांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनानंतर नौपाडा पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्याची सुटका केली.

गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या आधी करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. करोना प्रतिबंधक लसही आली नव्हती. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्यामुळे करोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गेल्या वर्षी गणेशोत्सवावर निर्बंध घालत त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळांना केले होते. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सव मंडळांनी राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.

मात्र आज राज्यातील कोरोना संसर्ग कमी होती असून यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविल्यामुळे राज्य शासनाने यंदाच्या गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांविरोधात गणेशोत्सव मंडळांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या निर्बंधांचा पुनर्विचार करण्याची मागणी मंडळांकडून होत आहे.

या मागणीचा विचार होत नसल्यामुळे ठाण्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी पालिका मुख्यालयासमोर आरती करून आंदोलन केले. मात्र काही वेळातच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Team Global News Marathi: