आजाराचे कारण देत नारायण राणे गुन्हा शाखेत गैरहजर मात्र दिल्लीत राहिले हजर

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणीअटक त्यानंतर सुटका करण्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे प्रकृती अस्वास्थाचे कारण देत सोमवारी अलिबागच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसमोर गैरहजर राहिले. पण दिल्ली येथून बोलावणे आल्याने ते थेट दिल्लीत हजर झाले. त्यामुळे राणे यांना आता १३ सप्टेंबर रोजी पुढील तारखेला गुन्हे शाखेसमोर हजेरी द्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना रात्री उशिरा महाडचे न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. न्यायदंडाधिकारी पाटील यांनी राणे यांची अटक योग्यच असल्याचे सुनावत त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन दिला. परंतु जामीन मंजूर करताना राणे यांनी ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर या दोन दिवशी रायगड पोलीस अधीक्षकांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजेरी द्यावी, असे आदेश दिले.

त्याचबरोबर या प्रकरणातील कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारांना धमकावत दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही बजावले आणि ३० ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी दयानंद गावडे यांच्यासमोर हजेरी लावावी असेही आदेश दिले.

Team Global News Marathi: