हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपाशी दोन हात करा! अमित शहांचे आव्हान

सत्तेसाठी शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केला. हिंदुत्व सोडले, अशी महाआघाडी जनतेला मंजूर नाही. हिंम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि दोन हात करण्यासाठी मैदानात उतरावे, तुम्ही तीन पक्ष आणि भाजप एकटा असा सामना होऊ द्या, असे थेट आव्हान गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांशी बोलताना दिले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून त्यांनी भाजपाला सोडले. हिंदुत्व सोडले, भाजपचा विश्वासघात केला. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिले आणि दोन्ही काँग्रेससोबत सत्तेत बसली. म्हणून शिवसेनेत हिमंत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी दोन हात करण्यासाठी समोर यावे. सिद्धांतहीन राजनीती जनतेला स्वीकार नाही, असेही मंत्री अमित शहा म्हणाले.

विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी

महाआघाडी सरकारच्या अध:पतनाची सुरुवात आता व्हायला हवी. महासंपर्क अभियानातूनच आपण निवडणुका जिंकू आणि त्याची सुरुवात पुण्यापासून व्हायला हवी. तुमच्या नेतृत्वाने तुमची मान खाली जाईल, असे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने, निधड्या छातीने, निर्भयतेने आणि विवेकाने मतदारांसमोर जा. लक्ष्य उंच ठेवा, जनता खूप द्यायला तयार आहे, मागताना संकोच करू नका’, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो

अमित शहा यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘माझ्या कारकिदीर्ची सुरुवात बूथ अध्यक्ष म्हणून झाली. बुथचा अध्यक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच घडू शकते. पक्षात जो मागत नाही, त्याला न मागताच सगळे काही मिळते. हा नेत्यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तेच पक्षाचे भविष्य आहे. कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: